Ad will apear here
Next
सदानंद रेगे
सदानंद रेगे (२१ जून १९२२ - २१ सप्टेंबर १९८२)मराठी कवितेचा आनंदरसास्वाद घेताना कवी सदानंद रेगे हे नाव राहून गेलं तर तसा फार मोठा फरक पडेल असं नाही. खुद्द रेगेंनाही तसा पडला नाही. वयाच्या तेराव्या वर्षी वडिलांचं छत्र गमावून, कुटुंबाच्या जबाबदारीखाली कोवळे खांदे पिचताना आलेले अनुभव मनाची घडण बदलून जातील यात शंका नाहीच. 

 ... वडील गेल्यानंतर कित्येक दिवस अंगणासमोर एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं त्यावर ते बसलेले मला दिसत असत. आठवणी पुसून टाकायचा माझ्यातला बुद्धिवाद प्रयत्न करीत होता. पण आता काही उपयोग नव्हता...

कवीबद्दल बोलताना हे का मधेच? प्रश्न वाजवी आहे. प्रत्येक कवीच्या कवितेची घडण समजून घ्यायला कवीमधल्या व्यक्तीपर्यंत जावंच लागतं असं नाही; पण काही मंडळींची कविता त्यांच्या हाडबांधणीतूनच येते. आणि ती समकालीनाच्या मुशीत बसेल न बसेल याची त्यांना पर्वा नसते. अशा वेळी त्या कविता वेड्या वा विक्षिप्त भासल्या (किंवा असल्या!) तरी त्यांच्या अस्सलपणाचा कस शोधताना हे प्रश्न कामाला येतात. "... मी का लिहितो, काही मला सांगता येत नाही. काहीतरी अंधुक अंधुक जाणवतं. पण पक्कं हाती लागत नाही. या प्रश्नापासून खूपदा मी पळून जाण्याचाच प्रयत्न करतो. कारण मनात सारखं भय वाटत असतं की, ज्या दिवशी या प्रश्नांची उत्तरं सापडली असं मला वाटेल त्या दिवशी माझे लेखन थांबल्याशिवाय राहणार नाही.... " "अक्षरवेल" ते "वेड्या कविता". अक्षरवेल या बहुतांश निसर्गकविताच.  

आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन
ऊनपावसाचे पक्षी आणी ओंजळीमधून 
आता मेल्या मरणाला जिती पालवी फुटेल 
गोठलेल्या आसवांना पंख नवीन येतील 

"... जे काही आजवर मी माझ्या साहित्यिक जीवनात केलं ते एका विशिष्ट अनुभवाने माझं मन पेटवून दिलं म्हणून... "

अक्षरवेल मधे ज्या जखमांना नवीन पंख फुटून भरून यायची आशा होती त्या हळूहळू अस्तित्वाची साक्षच होऊ लागतात. 

या उजाड उनाड माळावर 
माझ्या एकाकीपणाचा एकच साक्षी... 
डोळ्यांच्या खाचा झालेल्या 
बुरुजाआड कण्हणारा 
एक जखमी जहरी पक्षी...  

त्यांच्या जाणिवेला धुमारे फुटतात ते ही वेदनेचे. ही वेदना घेऊन रेगेंची कविता जाणिवेच्या पलीकडे जात राहते. 

देवापुढचा दिवा 
असू द्या रे तसाच...  
दिसूं दे देवाला 
हा अनादि अंधार... 

जाणिवेच्या पलीकडे नेणाऱ्या मृत्यूच्या वा आत्महत्त्येच्या अव्याहत भयाची प्रतिबिंबं सतत तरळत राहतात त्यांच्या कवितेतून.

सूर्याच्या नरडीवर उमटलेले सावल्यांचे व्रण चंद्राची अवेळ होण्याआधी 
एवढं एकच मागणं ऐका देवा 
कुणालाच कध्धी कध्धी पलीकडल्या पावलाचा धीर न व्हावा 

रेगेंचं कलाकार/कवींविषयीचं प्रेम हे त्यांचे केसरबाई केरकर, बा. सी. मर्ढेकर, बालकवी, काफ्का, व्हॅन गॉफ किंवा अगदी कार्ल मार्क्स असे काव्यविषय पाहिले की लक्षात येतं; पण बरेचदा विरूप वास्तवाला वेडाचं सोंग घेऊन हसणाऱ्या या वेड्या कविता. त्यातलं शहाणपण बघायला नेहमीच त्या परिसीमेवर जावं लागतं असं नाही. निव्वळ दहा-बारा शब्दांतूनही रेगे सहज व्यक्त होतात -

सर्व वस्तुमात्र पुसून टाकलं 
तरी शेवटी हात उरलेच 
नि हातातलं हे फडकं! 

त्यांच्या साहित्यावर फार असं लिहिलं गेलं नाही. त्यांच्या विक्षिप्तपणाच्या गोष्टी विखुरलेल्या आहेत; पण इतकं मात्र खरं की कवी, कथाकार, अनुवादक, नाटककार सदानंद रेगे, कला/साहित्यावर निष्ठेने प्रेम करत राहिले. स्वतःची जाणीव गढूळ न करता व्यक्त होत राहिले. मराठी कवितेत, मर्ढेकर व कोलटकर यामध्ये येणारं हे वळण प्रत्येक वाचकाच्या पावलांना दिसेल असं नाही आणि दिसलं तरी भावेल असंही नाही; पण म्हणून त्या वळणाचा दिमाख आणि सच्चेपणा उणावत नाही. 

- कौस्तुभ आजगांवकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XWLVCR
Similar Posts
अव्वल दर्जाचे कवी, संवेदनशील विडंबनकार - हेमंत गोविंद जोगळेकर कवी हेमंत गोविंद जोगळेकर अधूनमधून भेटत असतात आणि अर्थात त्यांच्याबरोबरच विडंबनकार हेमंत गोविंद जोगळेकरही. जोगळेकरांचा विडंबनकार हा कवीच्या आगेमागेच असतो. दुसऱ्या कवीचे संस्कार उचलून स्वतःच्या नकळत किंवा स्वतःला फसवून, हट्टाने कविता पाडून ‘मी ही कवीच!’ मिरवणाऱ्या कवींपेक्षा हे फार वेगळं आहे! दुसऱ्या कवीचे
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
कृष्णा सोबती यांचे समृद्ध करणारे लेखन कृष्णा सोबती यांना वयाच्या ९२व्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांचे साहित्य वाचून आपण समृद्ध तर होतोच; पण एखादे मूल्य जपताना कितीही संकटे आली, तरी मागे हटायचे नाही हेही आपण त्यांच्याकडून शिकतो. १८ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर २६ ते २८ मार्च २०२१ या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेचे संशोधक आणि विज्ञानासारख्या प्रामुख्याने इंग्रजीवरच आधारित असलेल्या क्षेत्रात कार्यरत असूनही शुद्ध आणि साध्या-सोप्या मराठी भाषेत साहित्यनिर्मिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language